कार्ल मार्क्स मराठी

Carl Marks MaRaathi

GkExams on 05-02-2019


कार्ल मार्क्स (जन्म: 1818 – मृत्यू: 1883) हे 19 हे एक जर्मन अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केले पण त्यांचे वर्गसंघर्षावरील लिखाण हे जास्त प्रसिद्ध आहे. फ्रेडरिक एन्जेल्स (Friedrich Engels) प्रमाणे मार्क्सने देखील तत्कालिन राजकीय लढ्यांमध्ये भाग घेतला. कार्ल मार्क्स यांनी "दास कॅपिटाल" या ग्रंथाचा पहिला खंड इ.स. 1867 मध्ये प्रसिद्ध केला.


कार्ल मार्क्स यांच्या विचारांची लोकप्रियता सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर कमी झाली असली तरी ते विचार शिक्षण क्षेत्र, राजकीय क्षेत्र, कामगार लढा यामध्ये अजूनही लोकप्रिय आहेत. मार्क्स यांचे विचार अनेक कम्युनिस्ट राज्ये आणि राजकीय चळवळींमध्ये अजूनही आदर्श मानले जातात.ते वर्ग संघर्षाचे प्रणेते होते

जीवन

कार्ल मार्क्स यांचा सामाजिक चळवळीवरील प्रभाव अतुलनीय आहे. मार्क्स स्वत: एक उत्कृष्ट अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ होते. जर्मनीतील जेना विद्यापीठामध्ये कायदा आणि तत्त्वज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर मार्क्स यांनी पत्रकार म्हणून काम सुरु केले.कार्ल मार्क्स यांनी इ.स 1848 रोजी कम्युनिस्ट विचारसरणीचा पाया घातला. फ्रेडरिच एन्गेल्स (Friedrich Engels) यांच्या सहकार्याने लिहिलेल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोत त्यांनी कामगार-मजूर वर्गाने क्रांती करून कम्युनिस्ट समाज स्थापन करावा असा विचार मांडला. मार्क्स यांनी स्वत: समाजवादाची स्थापना केली नसली तरी समाजवादावर त्यांच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांच्या स्फोटक विचारांमुळे त्यांना पॅरिस, ब्रसेल्स आणि नंतर लंडन येथे हद्दपार करण्यात आले.फ्रेडरिक एन्जेल्स यांनी मार्क्स यांच्या टिपणांच्या आधारे दास कॅपिटालचे उर्वरीत दोन खंड लिहून प्रसिद्ध केले.

मार्क्सचे विचार

कार्ल मार्क्सच्या शास्त्रीय समाजवादात द्वंद्वात्मक भौतिकवाद, ऐतिहासिक भौतिकवाद,अतिरिक्त मूल्य सिद्धांत, वर्गसंघर्ष, राज्यविहीन व वर्गविहीन समाज या साऱ्यांचा समावेश होतो.


उत्पादन व्यवहार, उत्पादनशक्ती, उत्पादनसंबंध, त्यातील अंतर्विरोध, खाजगी मालकी, शासनसंस्था, विचारसरणी, क्रांती इत्यादी मूलभूत संकल्पनांचा विचार करुन मार्क्सने मानवाचा उत्पादन व पुनरुत्पादनाचा व्यवहार, त्यातील उत्पादनशक्ती व उत्पादनसंबंध यांचे द्वंद्वात्मक नाते यांच्या आधारे इतिहासाचा तसेच त्याच्या काळातील वर्तमानाचा अभ्यास केला. या अभ्यासातूनच त्याने निष्कर्ष काढला की मानवी इतिहास हा वर्गलढ्याचा इतिहास आहे व उत्पादनसाधनांवरची भांडवली खाजगी मालकी हे आजच्या सर्व प्रश्नांचे मूळ आहे.


हेगेलच्या म्हणण्यानुसार, मानवी मनात एक विचार निर्माण होतो (वाद), त्याच्यातील उणिवा किंवा अंतर्विरोध म्हणजे प्रतिवाद असतो. वाद व प्रतिवादाच्या संघर्षत्मक समन्वयातून सुसंवाद निर्माण होतो आणि ही प्रक्रिया अव्याहतपणे सुरू राहते. ‘जाणिवा’ ह्या इतिहासाच्या चक्रातील प्रेरक घटक असतात असे हेगेलचे म्हणणे होते. मार्क्सला मात्र ‘जडद्रव्य’ किंवा ’पदार्थ’ अधिक महत्त्वाचे वाटले.

द्वंद्वात्मक भौतिकवाद

मार्क्सने विचाराऐवजी ‘पदार्थ’ महत्त्वाचा मानला. पदार्थ हेच मार्क्सने अंतिम सत्य मानले. आपल्या प्रतिपादनाच्या पुष्ट्यर्थ त्याने आधी भूमी पाहिल्यावरच माणसाच्या मनात बी पेरण्याचा विचार आला असा दृष्टांत दिला.


दास कॅपिटल या ग्रंथात मार्क्स म्हणतो : ‘हेगेलचे तत्त्वज्ञान डोक्यावर उभे असल्याचे पाहून मी त्याला पायावर उभे केले.’


पदार्थ अस्तित्वात येतो, विकसित होतो, कालांतराने नष्ट होतो व त्यातून नवीन पदार्थ निर्माण होतो. द्वंद्व-परिवर्तन-विनाश-निर्मिती अशी प्रक्रिया सदोदित चालू राहते. ‘जाणीवबुद्धी’ ही भौतिक जगाच्या प्रदीर्घ उत्क्रांतीची केवळ एक निर्मिती मात्र आहे, असे भौतिकवादी म्हणतात.


ऐतिहासिक भौतिकवाद (सामाजिक विकासाचा विरोध-विकासवादी भौतिकवाद) : ‘तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या मार्गांनी जगाचा केवळ अर्थ लावला आहे; पण मुख्य मुद्दा आहे तो जग बदलविण्याचा.’ मार्क्सने इतिहासाचा भौतिक अन्वयार्थ (इकॉनॉमिक इंटर्प्रिटेशन ऑफ हिस्ट्री) असा शब्दप्रयोग केलेला आहे. इतर संज्ञा फ्रेड्रिख एंगल्सने रूढ केलेल्या आहेत.

राज्यासंबंधी विचार

राज्याचा आधार पाशवी शक्ती हाच असतो. वर्गीय हितसंवर्धनाच्या गरजेतून शोषकांनी राज्याची निर्मिती केली. सर्वांचे कल्याण हा कधीच राज्याचा हेतू नसतो. राज्ये सर्वांच्या कल्याणासाठी नसल्यामुळे ती विलयाला गेलीच पाहिजेत.मार्क्सच्या मते हातांनी करायचे काम हे बौद्धिक कामापेक्षा अधिक महत्त्वाचे असते.


उत्पादन ही सामाजिक अभिक्रिया आहे. तिच्यामुळेच समाज उदयाला आला. ’माणूस हा निसर्गतः सामाजिक आहे, उदारमतवादच्या म्हणण्याप्रमाणे तो अण्वात्मक नाही’ असे मार्क्सचे म्हणणे आहे.


एकदा समाजाची आर्थिक संरचना कळाली की समाजातील इतर संरचना सहजपणे समजून घेता येऊ शकतील असे मार्क्सला वाटते. इमल्याचा पायावर अजिबात प्रभाव पडत नाही असे मार्क्सचे म्हणणे नव्हते या गोष्टीवर भा. ल. भोळे जोर देतात. आर्थिक संरचनेमध्ये उत्पादनाची साधने, उत्पादनाचे प्रेरक आणि उत्पादनाचे संबंध यांचा समावेश होतो. उत्पादनाच्या साधनांना उत्पादनाचे घटक अशीही संज्ञा आहे. सरंजामशाहीत जमीन हा तर भांडवलशाहीत भांडवल हा उत्पादनाचा घटक असतो. उत्पादनाच्या प्रेरकांमध्ये उत्पादनासाठी कोणत्या प्रकारचे बल वापरले जाते किंवा कोणत्या प्रकारची यंत्रसामग्री किंवा तंत्रज्ञान वापरले जाते याचा समावेश होतो. उत्पादनाच्या संबंधांमध्ये ‘असलेले’ आणि ’नसलेले’ असे दोन गट येतात. या दोन गटांच्या हितांमध्ये मेळ बसत नसल्याने वर्गसंघर्षास प्रारंभ होतो.


इतिहासपूर्व अवस्था, गुलाम बाळगणारा समाज, सरंजामशाही, भांडवलशाही आणि साम्यवाद अशा इतिहासाच्या पाच अवस्था मार्क्सने सांगितलेल्या आहेत.


मार्क्सला श्रमविभागणी मान्य आहे. अगदी प्रागैतिहासिक काळातही स्त्री-पुरुष आणि शिकारी व अन्नसंग्राहक अशी विभागणी असू शकते. मात्र विशिष्ट प्रकारचे श्रम करणारा श्रेष्ठ आणि बाकी हलक्या दर्जाचे अशी परिस्थिती निर्माण होणे हे संघर्षाचे मूळ ठरले असेल असे तो म्हणतो. उदाहरणार्थ सरंजामशाहीत बुद्धिजिवींची कामे ही श्रेष्ठ दर्जाची समजली जात होती. बुद्धिजीवी आणि गुलाम अशी विभागणी ही पहिली अनैसर्गिक श्रमविभागणी होती असे मार्क्स म्हणतो. प्लेटो आणि अ‍ॅरिस्टॉटल यांनी भौतिक श्रमांपेक्षा तर्कबुद्धी श्रेष्ठ या भूमिकेचे समर्थन केले होते. कल्पना किंवा जाणिवा ह्या पदार्थापेक्षा श्रेष्ठ आहेत अशी भूमिका घेण्यामागे आणि प्रत्येकामधील तर्कबुद्धीचा अंश एकसारखा नसतो असे म्हणण्यामागे फार मोठे उद्दिष्ट आहे असे मार्क्सला वाटते.

क्रांती

उत्पादनाच्या पद्धतीतील हिंसात्मक बदल म्हणजे ‘क्रांती’.खऱ्या जाणिवा आणि चुकीच्या जाणिवा असा भेद मार्क्सने केला आहे. ‘आपल्या जाणिवांवरून आपले अस्तित्व ठरत नसून आपल्या अस्तित्वाचा आपल्या जाणिवांवर निर्णायक प्रभाव पडतो’ असे मार्क्स म्हणतो. आपण राहत असलेल्या जगाचे खरे स्वरूप श्रमिकांनी समजावून घेतले पाहिजे. आपल्या शोषणाची जाणीव त्यांना झाली पाहिजे. विचारप्रणाली किंवा धर्माच्या अफूने श्रमिकांची दिशाभूल होते असेही मार्क्सला वाटते.Comments

आप यहाँ पर कार्ल gk, मार्क्स question answers, मराठी general knowledge, कार्ल सामान्य ज्ञान, मार्क्स questions in hindi, मराठी notes in hindi, pdf in hindi आदि विषय पर अपने जवाब दे सकते हैं।

Labels: , , , , ,
अपना सवाल पूछेंं या जवाब दें।
Register to Comment